एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. आता शिंदे यावर नेमकं काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख असलेले शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील एकूण 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये जिल्हा समन्वयक, उपजिल्हा प्रमुख यांच्यासह वेगवेगळ्या तालुक्यांच्या प्रमुखांचा समावेश आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वच नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.
एकनाथ शिंदे यांना सांगूनही काही बदल झाला नाही
पक्षातील काही लोक अधिकार नसताना पदाधिकारी निवडी करत आहेत. संपर्कप्रमुख असलेले शिवाजी सावंत यांच्या तालुक्यातील निवडी लोकसभा संपर्कप्रमुख असलेल्या व्यक्ती करत आहेत. याबाबत आम्ही पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना सांगूनही काही बदल झाला नाही. त्यामुळे आज आम्ही आमच्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत, अशी भूमिका यावेळी शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक दिलीप कोल्हे आणि उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले यांनी मांडली आहे.
सोलापुरात पक्षाला खिंडार, एकनाथ शिंदे कसा मार्ग काढणार
दरम्यान, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असल्याने सर्वच स्थानिक पदाधिकारी पक्षासाठी फार महत्त्वाचे आहेत. कारण या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जाणार असल्याने यावेळी तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. असे असताना शिंदे गटाला सोलापुरात मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आता शिंदे यातून मार्ग कसा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे